वर्धा : कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता गृहविलगीकरणात असलेल्या गंभीर कोरोनाबाधित रुग्णांना तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवक तसेच तलाठी यांच्यावर राहील. तसेच या सूचनांचे पालन न केल्यास गावातील रुग्णाचा मृत्यू झाला तर गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यावर कार्यवाही केली जाईल, असा आदेश जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. या आदेशामुळे तिन्ही संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरानंतर आता गावागावामध्येही कोरोना पोहोचल्याने तालुक्यातील सर्व गावात आशा, अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील यांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना दैनंदिन भेटी द्याव्या. पल्स ऑक्सिमीटरने त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासावे व शिक्षकानेही गावाला भेट देऊन आशा, अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील यांच्याकडून रुग्णांची माहिती गोळा करून ती माहिती कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राला सादर करावी. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रावरून तालुक्याला व तालुक्यावरून सर्व माहिती एकत्रित करून जिल्ह्याला सादर करावी. सर्व को-मार्बिट असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती आशा व अंगणवाडी सेविकांनी गावातील सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांना त्वरित द्यावी. त्यानंतर सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांनी पॉझिटिव्ह रुग्णांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे.
को-मार्बिट पॉझिटिव्ह रुग्णाला गृहविलगीकरणात न ठेवता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची जबाबदारीही सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांचीच राहील. या सूचनांचे पालन न केल्यास आणि सदर रुग्णाचा मृत्यू झाल्यास गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी या तिघांवरही कार्यवाही केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३ मे रोजी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची जबाबदारी इतरांवर लादण्याचा हा प्रकार असून तो अन्यायकारक असल्याचे मत तिन्ही संघटनांकडून व्यक्त होत आहे.