वर्धा : महिला अत्याचाराच्या घटनात सातत्याने वाढ होणे, ही चिंतेची बाब मानली जात आहे. अल्पवयीन, तरुणी, विवाहित महिला इतकेच नव्हे तर अगदी चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्यापर्यंत नराधमांनी मजल गाठली आहे. विविध आमिष दाखवून तर नातेवाइकासह प्रियकराकडूनच अनेकदा घात झाल्याच्या घटना घडल्या आहे. अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात १४ अत्याचाराच्या तर ४७ विनयभंगाच्या घटना घडल्या असून विकृत मानसिकता याला कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे.
आधी तरुणीला प्रेमजाळ्यात अडकवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले जाते. काही दिवस हा प्रकारा चालल्यानंतर फसवणूक झाल्याची बाब मुलीच्या लक्षात येताच मग न्यायासाठी पीडिता पोलीस ठाण्याची पायरी गाठतात. मित्र म्हणूनही विश्वासाचे नाते निर्माण करणाऱ्यांकडुन संधी साधून अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काहींनी तर वडील, काका, मामा, भाऊ या पवित्र नात्यालाच कलंक फासला आहे. नातेवाडकांनी अत्याचार केल्यानंतर ही घटना कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली जाते. पीडित गप्प राहिल्याने पुन्हा नातेवाइकांची हिंमत बळवते. व शारीरिक शोषणाची मालिकाच सुरू होते. मात्र, हा किळसवाणा प्रकारा असह्य झाल्यानंतर पीडितेचा बांध फुटतो आणि या घटनांना वाचा फुटते. अशा घटनांनी सामाजिक मन हादरून गेले आहे.
घरातच ‘ती’ सुरक्षित नसेल तर विश्वास ठेवायचा तरी कुणावर, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दोन वर्षांपासून तर सात वर्षांपर्यंतच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्या मुलींचाही अश्याच प्रकारे घात झाला आहे. या घटना का घडत आहेत, त्या मागील कारणे काय, याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. यासर्वच गुन्ह्यांची नोंद करीत सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ पथक रस्त्यावर
चिंडीमारी, अत्याचार अशा घटना रोखण्यासाठी पोलीस दलात स्वास महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ पथक कार्यरत आहेत. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांकही व्हायरल करण्यात आला आहे. पालकांनी मुलांवर अतिविश्वास न ठेवता आपली जबाबदारी ओळखून जागृत राहिल्यास उद्या त्यांच्यावर रडण्याची वेळ येणार नाही.