वर्धा : बोरगाव (मेघे) येथील रहिवासी राजू परचाके याच्या खून प्रकरणातील आरोप असलेल्या आरोपी शैलेश कोवे याच्याविरुद्ध काहीही पुरावे न मिळाल्याने उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
मृत राजू परचाके याने १६ फेब्रुवारी २०२० रोजी शोभा पेंदाम हिच्या डोक्यावर काठीने मारहाण केली होती. तिने याबाबतची तक्रार पोलिसांत दिली होती त्यामुळे राजू परचाके हा फरार झाला होता. मात्र, रेखा परचाके हिला सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजू परचाकेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. सागर पेंदाम व त्याच्या दोन मित्रांनी राजूचे हातपाय बांधून त्याला विहिरीत फेकून दिल्याची तक्रार रेखा परचाके हिने सावंगी पोलिसांत दिली होती.
पोलिसांनी याप्रकरणी सागर पेंदाम, शैलेश कोवे आणखी एका आरोपीस अटक केली होती. पोलिसांनी दोषारोपपत्र तयार करीत न्यायालयात दाखल केले, आरोपी शैलेश कोवे याने जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. पण, न्यायालयाने अर्ज नामंजूर केला. शैलेशने उच्च न्यायालय नागपूर येथे जामीन अर्ज दाखल केला. शैलेशची बाजू मांडताना साक्षीदारांच्या बयाणातील विसंगती, ओळखपरेड न केल्याने तसेच आरोपीपासून काहीही जप्त न झाल्याबाबत न्यायमूर्तींच्या लक्षात आणून दिले असता उच्च न्यायालयाने आरोपी शैलेश कोवे याला २५ हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयात आरोपी शैलेश कोवे याच्यातर्फे अँड. श्याम दुबे यांनी बाजू मांडली.