वर्धा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने मजूर, शेतमजूर, शेतकरी, अंत्योदय आणि प्राधान्य गटातील नागरिकांच्या अन्नाधान्याची गरज लक्षात घेऊन त्यांना एप्रिल महिन्याचे अत्रधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील २ लाख ६२ हजार ८८२ शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.
राज्यातील आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता आणि ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागलेल्या निर्बंधामुळे गरीब कुटुंब उपाशी राहू नये, यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थींना एक महिन्याचा शिधा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी एप्रिल महिन्याचे रेशन स्वस्त धान्य दुकानात पोहचविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील ८५७ स्वस्त धान्य दुकानांपैकी २७८ दुकानांमध्ये ६ हजार २१० मेट्रिक टन धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित धान्यही टप्प्याटप्प्याने पोहचविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
असे मिळेल धान्य
जिल्ह्यात अंत्योदय योजनेतील ४७ हजार ८६८ व प्राधान्य कुटुंबातील २ लाख १५ हजार १४ अशा २ लक्ष ६२ हजार ८८२ शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. अंत्योदय योजनेत प्रतिकुदुंब १५ किलो गहू व २० किलो तंदुळ तर प्राधान्य कुटुंबातील तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे ५ किलो धान्य प्रतिव्यक्ती मोफत देण्यात येणार आहे.