वर्धा : यावर्षीचा पहिला सुपरमून पाहण्याचा पहिला योग मंगळवारला (ता. २७) आहे. चंद्रपृथ्वी भोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असतो. त्यामुळे तो महिन्यातून एकदा पृथ्वीजवळ येतो व एकदा दुरही जातो. मात्र, ज्यावेळी चंद्र पृथ्वीपासून वाजवीपेक्षा कमी अंतरावर येतो. त्यावेळेस चंद्राचे बिंब नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा मोठे दिसते. अशा चंद्राला सुपरमून म्हणतात.
साधारणता बारा महिन्यांचे कालचकात चार ते सहा सुपरमुनचे योग येतात. गत वर्षी १५ नोव्हेंबर शेवटचा सुपरमून होता. तर यंदाचा पहिला सुपरमून मंगळवारला असणार आहे. त्यानंतरचे सुपरमून २६ मे, ४ नोव्हेंबरला असणार आहे. आज जागतिक वेळेनुसार ११.३२ वाजता चंद्र पृथ्वीपासून किमान अंतरावर येईल. यावेळी हे अंतर ३ लाख ५४ हजार ६१५ किमी राहील.
या बिंदूवर चंद्राजवळ २२ मिनिटांपर्यंत राहील. तो नेहमीच्या चंद्रापेक्षा ३० टक्के अधिक तेजस्वी व आकारमानाने १४ टक्के मोठा दिसेल. सुपरमुन या शब्दाची व्याख्या खगोलशास्त्रातील नाही. सुपरमून हा शब्द रिचर्ड नोले या फलज्योतिष वाल्याने १९७९ मध्ये प्रचारात आणला. सुपरमुन प्रमाणेच आता वर्षातील प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या चंद्राला वेगवेगळी नावे देण्याचा प्रघात आहे. त्या नुसार या महिन्यातल्या चंद्राला पिंक मून म्हणतात. त्यामुळे आजचा चंद्र हा पिंक मून असेल. आज चंद्र पृथ्वीपासून न्यूनतम अंतरावर येणार असल्यामुळे यावेळेस नेहमीपेक्षा जास्त उंचीच्या लाटा निमीण होण्याची शक्यता राहील.