एकच मिशन शेतकरी आरक्षण! कोरोनाग्रस्त शेतकरी रुग्णांसाठी राज्यातील पहिले केअर सेंटर वर्धा जिल्ह्यात होणार; वर्धा, अमरावती जिल्ह्यातील रुग्णांना मिळणार लाभ

वर्धा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. या रुग्णांना शहरात व तालुका मुख्यालयात उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नाही, ही बाब लक्षात घेऊन ‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’ने आर्वी येथे ३८ खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रात आर्वी उपविभागातील सर्व तालुक्यांतील रुग्ण व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांतील रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’चे प्रणेते शैलेश अग्रवाल यांचे आर्वी येथे सुसज्ज रुग्णालय आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ते रुग्णालय बंद करण्यात आले होते. गतवेळी कोरोनाची लाट आल्यानंतर अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाकडे सदर रुग्णालय केअर सेंटर म्हणून नि:शुल्क देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासंदर्भात त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्याशी पत्रव्यवहार केला होता व राज्य सरकारलाही तशी विनंती केली होती. मात्र, सदर रुग्णालय सेंटर त्यावेळी सेवेत घेण्यात आले नव्हते. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असल्याने गावांची परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन पुन्हा अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व आरोग्य यंत्रणेकडे हे रुग्णालय केअर सेंटर म्हणून देण्याची तयारी दर्शविली. मात्र, प्रशासनाकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने अग्रवाल यांनी आता सदर रुग्णालयात ३८ खाटांचे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात दहा ऑक्सिजनयुक्त खाटा असून, उर्वरित खाटा विलगीकरणासाठी वापरल्या जाणार आहेत. लवकरच हे रुग्णालय सुरू केले जाणार असून, आर्वी, कारंजा, आष्टी व अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील रुग्णांना येथे उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here