सायली आदमने
वर्धा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभामध्ये तत्कालीन कामगार अधिकारी, कर्मचारी व इतरांनी १४ मे २०२० ते ९ सप्टेंबर २०२० या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल ५ कोटी ७९ लाख ९ हजार ४०० रुपयांचा अपहार केल्याचे दिसून आले आहे.
रामनगर ठाण्यात तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध॒ गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. गतवर्षी चार महिन्याच्या कालावधीत बांधकाम कामगार कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या लाभात गैरप्रकार होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याची तक्रार सरकारी कामगार अधिकारी कौस्तुभ जगन्नाथ भगत यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, तत्काळीन सरकारी कामगार अधिकारी प.ध. चव्हाण यांनी १४ मे २०२० ते ९ सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ वर्धा यांच्या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील १८ हजार २१८ बांधकाम कामगारांना २३ कोटी ५ लाख ६५ हजार ८०० रुपयांच्या लाभाचे वाटप केले.
मात्र, विविध कल्याणकारी योजने निहाय ६ हजार १८३ अर्ज कार्यालयाच्या अभिलेखावर उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन कामगार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ५७ कोटी ७९ लाख रुपयांचा अपहार केल्याचे दिसून आल्याने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर करीत आहेत.