वर्धा : वेळ मध्यरात्री २ वाजताची… रस्ते निर्मनुष्य… अन् अचानक आकाशात आगीचे उठणारे लोळ… हे पाहून नागरिकांनाही धक्का बसला. कारला बायपास रस्त्यालगत असलेल्या ग्रीनसीटी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला अन् हॉटेलमधील सर्व साहित्य जळून कोळसा झाला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शुभम मांडवगडे याच्या मालकीचे कारला बायपास रस्त्यालगत ग्रीन सिटी हॉटेल आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल मागील काही दिवसांपासून बंदच आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये अचानक आग लागली. हॉटेलमधून आगीचे लोळ उठू लागले. तितक्यातच हॉटेलमध्ये असलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला अन् आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता आगीचे लोळ उठू लागले.
दरम्यान, एका सुजाण नागरिकाला धूर दिसल्याने त्याने बाहेर येऊन पाहिले असता, हॉटेल जळत होते. त्याने तात्काळ याची माहिती रामनगर पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक मिश्रा, संदीप खरात, राहुल दुधकोहळे, संतोष कुकडकर, राजू अकाली घटनास्थळी पोहोचले. नगरपालिकेच्या दोन अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. रविवारी सकाळी रामनगर पोलिसांनी नुकसानाचा पंचनामा केला.
दरम्यान, शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, लागलेल्या आगीत हॉटेलमालक शुभम मांडवगडे याचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे एपीआय मिश्रा करीत आहेत.