आर्वी : नजीकच्या दहेगाव (मुस्तफा) गावात भरकटलेल्या अस्वलीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. अस्वलीला पकडण्यात वनविभागाच्या कर्मचाऱयांना अपयश आल्याने नागरिकांत रोषाचे वातावरण निर्माण झाले होते.रविवारी सकाळच्य सुमारास वनविभागाचे पथक गावात दाखल झाले अन् अस्वलीचा शोध घेणे पुन्हा सुरू झाले. त्यामुळे अजूनही अस्वलीची दहशत गावकऱ्यांमध्ये कायम आहे.
दहेगाव येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास माता मंदिर परिसरात अस्वली दाखल झाली होती. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही अस्वली जंगलातून दहेगाव मुस्तफा या गावात भरटकली. तिच्या किंचाळण्याने संपूर्ण गाव रस्त्यावर आले होते. पोलीस पाटलांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले, पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने अस्वलीला गावातून हाकलून लावले. मात्र पुन्हा दिसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाचे पथक गावात दाखल झाले असून, त्यांच्याकडून अस्वलीचा शोध सुरू आहे. रणरणत्या उन्हामुळे वाघ, बिबट्यासह अन्य वन्यप्राणी गावांकडे मोर्चा वळवत आहेत. यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. वनविभागाने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी आणि शेतमजुरांतून जोर धरत आहे.