पवनार : कोरोनामुळे गावातील खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे स्थानिक विविध आजारांच्या रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने गावात पर्यायी आरोग्य यंत्रणेची उभारणी करावी, अशी मागणी उपसरपंच राहुल पाटणकर यांनी केली आहे.
गावातील डॉक्टर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित आढळल्याने दवाखाने बंद आहेत. त्यामुळे प्राथमिक तपासणी कुठे करावी, या विवंचनेत रुग्ण घरीच थांबत आहेत. सरपंचसुद्धा विलगीकरणात असल्याने सध्या उपसरपंचांवरच जबाबदारी आली आहे. त्यांनी गावात वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे. गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असले तरी ते ५ नंतर बंद होते तसेच उपकेंद्रातील डॉक्टर नियमित लसीकरण, कोरोना चाचणी यात व्यस्त असतात. ५ नंतर डॉक्टर निघून जात असल्याचेही राहुल पाटणकर यांनी सांगितले. गावात दीडशे कोरोनाबाधित आहेत. मात्र, त्यांना नियमित आरोग्यसेवा मिळत नाहीत. अशावेळी वेळी एक तर उपकेंद्र २४ तास सुरू ठेवणे गरजेचे आहे किंवा नियमित डॉक्टर ठेवणे गरजेचे असल्याचे उपसरपंच पाटणकर म्हणाले.
कोरोनाकाळ लक्षात घेता, उपकेंद्राचे डॉक्टर हे मुख्यालयी असणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. कांबळे या एकमेव निवासी परिचारिका होत्या. याच काळात त्यांचीही बदली करण्यात आली. पवनार येथील वैद्यकीय अधिकारी रश्मी कपाले या सहकार्य करीत नसल्याची खंतही पाटणकर यांनी व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत व्यवस्था करतो, असे सांगितल्याचे ते म्हणाले.