वर्धा : जिल्ह्यात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने तसेच जिल्ह्यातील अनेक व्यक्ती गाफिल असल्यागत वागत असल्याने सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. अशातच ऑक्सिजन आणि रेमडेसिविरच्या मागणीत वाढही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, रेमडेसिविर तसेच कोविड व्हॅक्सिनबाबतची माहिती जाणून घेतली असता कोविडची प्रतिबंधात्मक लस वेटिंगवर तर ऑक्सिजन तसेच रेमडेसिविरचा मुबलक साठा असल्याचे सांगण्यात आले.
भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सेवाग्राम तसेच सावंगी (मेघे) येथील रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन साठवणूक क्षमता वाढविण्यात आली आहे. तर रेमडेसिविर या औषधाचा तुटवडा निर्माण होऊ नये तसेच त्याचा पुरवठा नियमित होत रहावा, यासाठी विशिष्ट यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्याच्या मागणीच्या तुलनेत या दोन्ही बाबींसह कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पाहिजे तितका पुरवठा होत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या तिन्हीविषयी वेळोवेळी आढावा बैठक घेत वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत लस, ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाचे लिक्विड ऑक्सिजन आणि रेमडेसिविर औषधाचा होत असलेल्या पुरवठ्याकडे बारकाईने लक्ष असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगतले.