वर्धा : काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे देशातील शेतकरी अवकाळी पाऊस आणि कोरोना विषाणूचा संसर्ग अशा दुहेरी संकटात सापडला होता. पण शेतकऱ्यांना सुखावणारी एक बातमी हवामान खात्यानं दिली आहे.
यावर्षीचा मान्सून दिलासादायक असून देशात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे यावर्षी देशातील शेतकऱ्यांच्या शेतात चांगल पीक येऊ शकणार आहे, याचा फायदा कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी देखील होणार आहे.
भारतात दरवर्षी साधारणतः जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मान्सूनचा पाऊस पडतो. मागील तीन वर्षांपासून देशात पावसाची स्थिती सामान्य आहे. यावर्षी देखील ही स्थिती कायम राहणार असून 96 ते 104 टक्के इतका पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 96 ते 104 टक्के दरम्यानचा पाऊस हा आपल्या देशात सामान्य पाऊस मानला जातो. यावर्षी देशात दुष्काळाची शक्यता नाही, असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.भारतातील 65 टक्के लोकसंख्या अजूनही शेतीशी निगडीत व्यवसाय करतात. यातील बहुतांशी शेतकरी मान्सूनच्या पावसावर शेती करतात. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक मोलाचं ठरणार आहे. यावर्षीचा मान्सूनबाबतचा दुसरा अहवाल मे महिन्यात जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर देशातील मान्सून स्थिती आणखी स्पष्ट होऊ शकेल.
मान्सून म्हणजे काय?
बरेच जण पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याला मान्सून समजतात. प्रत्यक्षात मान्सून म्हणजे ठरावीक काळाने दिशा बदलणारे वारे. शास्त्रोक्त व्याख्येत मान्सून म्हणजे पर्जन्य नाही. ‘मान्सून’ हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. मौसिम या शब्दाचा अरबी भाषेत अर्थ ‘ऋतू’ असा होतो. अरबी खलाशी अरबी समुद्रातील दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांचे वर्णन करण्यासाठी या शब्दाचा वापर करत. दिशा बदलणारे हे वारे सहा महिने नैर्ऋत्येकडून तर बाकी सहा महिने ईशान्येकडून वाहतात.पावसाळ्यातील पाऊस म्हणजे याच मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस म्हणजेच मोसमी पाऊस किंवा मान्सूनचा पाऊस होय.
इतरांपेक्षा वेगळा कसा ?
मोसमी वारे इतरांपेक्षा वेगळे असतात. ते वर्षाच्या विशिष्ट कालावधीत आपल्याकडे येतात आणि विशिष्ट कालावधीत आल्या वाटेने निघून जातात. भारताच्या बहुतांश भागाचा विचार करायचा तर हे वारे आपल्याकडे जून ते सप्टेंबर या काळात येतात आणि त्यानंतर माघारी निघून जातात. हे वारे येतांना समुद्रावरील बाष्प घेऊन येतात आणि पाऊस पाडतात. म्हणून भारतात सर्वाधिक पाऊस याच काळात पडतो. संपूर्ण भारतात सरासरी ८९० ते 1200 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. मान्सूनला पाऊस समजण्याची चुकी करू नका. पावसाळ्यातील वृष्टीला मोसमी पाऊस म्हणा किंवा मान्सूनचा पाऊस.
कशी असते प्रक्रिया?
जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. याउलट पाण्याला तापण्यासाठी तसेच थंड होण्यासाठीही जास्त वेळ लागतो. दिवसा जमीन समुद्रापेक्षा लवकर तापते. त्यामुळे सायंकाळी जमिनीचे तापमान समुद्रापेक्षा जास्त असते. तापमान जास्त झाले की तेथे हवेचा दाब कमी असतो. वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात.
समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे बाष्पयुक्त वारे म्हणजे मान्सून वारे त्यामुळे दुपारी वारे हळूहळू जास्त दाबाकडून कमी दाबाकडे अर्थात समुद्रावरून जमिनीकडे वाहू लागतात. साहजिकच समुद्रावरून येणारे वारे आपल्यासोबत मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणतात. या वाऱ्यांची दिशा भारताची नैऋत्य बाजू आहे. त्यामुळेच याला ‘नैऋत्य मोसमी वारे’ असेही म्हणतात. या वाऱ्यांमुळे भारताबरोबरच श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि चीनच्या काही भागांत पाऊस पडतो. अशा बाष्पयुक्त वाऱ्यामुळे भारतीय उपखंडाला पाऊस मिळतो.
मागील आठवड्यातच स्कायमेटंन यावर्षीचा मान्सून रिपोर्ट जाहीर केला होता. स्कायमेटनं आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की, यावर्षी जूनपासून सुरू होणारा नैऋत्य मान्सून 2021 मध्ये दीर्घ-कालावधी सरासरीच्या (LPA) 103 टक्के सामान्य राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाची शक्यता नसल्याचंही या संस्थेनं स्पष्ट केलं होतं. भारतीय हवामान खात्याच्या या नव्या अहवालामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
संयोजक :- निखिल रमेश यादव संस्थापक व अध्यक्ष कृषि शास्त्र समुह
स्त्रोत:- हवामान विभाग