वर्धा : मृताच्या नावे दुसऱ्याला उभे करुन बनावट कागदपत्राव्दारे भूखंडाची विक्री केल्याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहे.
भिमेंद्र पुंडलिक कांबळे व महेंद्र भगत असे आरोपींचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथील रहिवासी कृष्णकांत गयाप्रसाद वर्मा व त्यांचा मित्र हरिश्चंद्र पुंडलिक कांबळे हे दोघेही अनेक वर्षांपासून भूखंड खरेदी- विक्रीचा व्यवसाय करित होते.
या दोघांनीही सावंगी (मेघे) येथील शेत सर्वे क्रमांक २०२/१ मध्ये भूखंड खरेदी केला होता. याची विक्रीही हरिश्चंद्र उर्फ हष्षेंद्र कांबळे यांच्या नावाने करण्यात आली होती. हरिश्चंद्र कांबळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा आऊ भिमेंद्र कांबळे याने या भूखंडाचे बनावट कागदपत्र तयार करुन मृताच्या नावावर दुसऱ्याला उभे करुन तो भूखंड विकला. याकरिता त्याने महेंद्र भगत याची मदत घेऊन दोघांनीही ४ लाख ७९ हजार रुपये हडप केले. याची माहिती मिळताच कृष्णकांत वर्मा यांनी भिमेंद्र कांबळे व महेंद्र भगत यांच्या विरुद्ध सावंगी पोलिसांत तक्रार नोंदविली.