सेवाग्राम : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांचा बेजबाबदारपणा आणि बेफिकिरी वाढत चालली असून हमदापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील चानकी, चारमंडळ, जयपूर गावांत कोरोनाचा विस्फोट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
हमदापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चानकी गावात २३, जयपूर येथे ४३, तर चारमंडळ येथे ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रातून मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाचा विस्फोट आता ग्रामीण भागातही होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. याची सुरुवात १२ एप्रिलपासून सुरू झालेली आहे. जयपूर येथील एक भाग कंटेनमेंट आणि बफर झोन तयार करण्यात आल्याने परिसर सील करण्यात आला आहे.
तिन्ही गावांना सेलू येथील तहसीलदार महेंद्र सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील बेले तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. कोरोना विषाणू वेगात पसरत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती वाढली असून ही धोक्याची घंटा आहे.