वर्धा : मागील काही महिन्यांपासून शहरात भुरट्या चोरट्यांनी डोकेवर काढले होते. त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी कारवाई करीत अनेक चोरट्यांना पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर काही काळ शहरात चोऱयांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, पुन्हा एकदा चोरट्यांनी डोकेवर काढले असून शहरात मंगळवारी दोन ठिकाणी घरफोडी झाली असून लाखो रुपयांचा ऐवज तसेच रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली.
रामनमर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडवगडे लेआऊट सिंदी मेघे परिसरातील रहिवासी योगेश पुरुषोत्तम घोडे यांच्या घरातील दाराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटात ठेवलेले १५ ग्राम वजनाचे 30 हजार किमतीची सोनसाखळी, चांदीच्या तोरड्या आणि २० हजार रुपये रोकड असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा पुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी रामनगर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तर दुसरी घरफोडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर येथे झाली. प्रीतम दिलीप नाडे कुटुंबासह जळगाव येथे कार्यक्रमाला गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलुप तोडून घरात प्रवेश करून लॉकरमधून १५ हजार रुपयांची रोख रक्कम, लहान मुलाचे पैजण असा एकूण १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलेला दिसला. या प्रकरणी पोलीसांत तक्रार दिली.