

वर्धा : जादू टोण्याद्वारे पैशांचा पाऊस पाडणाऱ्या ढोंगी बाबाच्या सांगण्यावरून पीडितेच्या आई व नातलगाने चक्क दोघांच्या मदतीने पीडितेचे अघोरी कृत्यातून वर्षभरापासून शोषण केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या प्रकरणाचा भांडाफोड रामनगर पोलिसांनी केला असून पोलिसांनी याप्रकरणात दोघांना अटक केली असून तीन दिवस पोलीस कोठडी मिळवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बालू उर्फ प्रवीण मंगरूळकर, किशोर सुपारे असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, २१ वर्षीय युवतीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हिरावले होते. नातलग आणि आई तिचा सांभाळ करायचे. उच्च शिक्षण घेण्यासाठी पीडितेने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण वर्ध्यात केले. पीडिता मुळची हिंगणघाट तालुक्यातील एरणगाव येथील रहिवासी आहे. पीडितेच्या आई व काकाला बालू मंगरूळकर हा भेटला व पैशांचा पाऊस पाडणारा ‘डीआर’ (मांत्रिक) याच्याशी ओळख असल्याचे सांगितले. आपल्यावरील कर्ज फेडता येईल, आपण मालामाल होवू या आमिषातून पीडितेची आई आणि काका हे दोघे वर्ध्यातील कारला चौकात आले आणि पीडितेला भूलथापा व धमकावून ऐरणगाव, नांदगाव शेत शिवारातील निर्जनस्थळी नेऊन विवस्त्र करून शरिराला लिंबू लावण्याचा प्रकार केला.
पीडितेने याला विरोध करून तेथून पळ काढला. मात्र, तिच्या आईने तिला धमकावून पुन्हा पीडितेला तयार करून वारंवार असे अनेक प्रयोग केले. त्यामुळे पीडिता वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून घरातून पळून गेली. पीडितेच्या मिसिंगची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलीस तपासात पीडितेला पोलीस ठाण्यात आणल्यावर पीडितेने हा सर्व प्रकार पोलिसांसमोर कथन केला. त्यानंतर पोलिसांनी अघोरी कृत्याचा भांडाफोड केला.
पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी तपास करीत हा सर्व प्रकार अंनिसचे राज्य संघटक पंकज वंजारे यांना सांगितला. दरम्यान पंकज वंजारे यांनी सखोल चौकशी करून हा सर्व प्रकार उघडकीस आणून पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी अनिष्ठ प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचा समुह उच्चटन करण्यासाठी अधिनियम २०१३ कलम ३(२) भादवी ३५४ अधीक ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.