बडोदा : देशभरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता गुजरातमधील बडोद्यात जुळ्या नवजात बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वडोदरा येथे जुळ्या नवजात बालकांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. अतिसार आणि पाण्याचं प्रमाण कमी असल्याने या बालकांना जन्मानंतर १५ दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी या दोन्ही बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. सध्या या बालकांची प्रकृती चांगली आहे, पण त्यांना अजून डिस्चार्ज दिलेला नाही, अशी माहिती एसएसजी हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. अय्यर यांनी दिली.
गुरुवारी गुजरातमध्ये दिवसभरात कोरोनाचे २४१० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील संक्रमित लोकांची संख्या ३,१०,१०८वर पोचली आहे. तसेच गेल्या २४ तासात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४५२८ एवढी झाली आहे. २०१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत गुजरातमधील २,९२,५८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती गुजरात राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.