

वर्धा : जुन्या वादातून व्यक्तीची धारदार हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तालुक्यातील वासी गावात घडली. गिरड पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या. परमेश्वर जनर्दन वागदे (४३) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वासी गावातील नेताजी विद्यालयासमोर परमेश्वर वागदे याची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाणेदार सुनील दहिभाते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता परमेश्वरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असता गावातीलच संशयीत म्हणून अपूर्व गोपाळ नगराळे याला ताब्यात घेत त्याची चौकशि केली असता परमेश्वरला जुन्या वैमनस्यातून जीवाने
ठार केल्याची त्याने कबूली दिली. मृतक परमेश्वर याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी अपूर्वच्या पत्निला शिवीगाळ करीत असे.
दरम्यान एकदा परमेश्वरला आरोपी अपूर्वने अंगणवाडीतून हाकलून लावले होते तेव्हा त्यांच्यात वाद झाला होता. १९ मार्चच्या रात्री देखील परमेश्वरने दारूच्या नशेत अपूर्वला शिवीगाळ केली होती. याचाच राग मनात ठेवून अपूर्वने रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास परमेश्वरच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून जागीच ठार केले आणि तेथून निघून गेला. पोलिसांनी आरोपी अपूर्वला नंदोरी येथील बहिण सुचिका नगराळे हिच्या घरुन अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, ठाणेदार सुनिल दहिभाते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप निंबाळकर, प्रश्नांत ठोंबरेरवी घाटुर्ल, योगेश सोरटे, नरेंद्र बेलखेडे आदींनी केली. पुढील तपास पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात गिरड पोलीस करीत आहेत.