राहुल काशीकर
हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील अंकिता पिसुड्डे जळीतकांडात शनिवारी (ता. २०) जप्ती पंचनाम्यातील पंचांची साक्ष नोंदविण्यात आल्याने त्यांचा उलटतपास पूर्ण झाला आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची न्यायालयात उपस्थिती नसल्याने सरकार पक्षाच्या वतीने ॲड. दीपक वैद्य यांनी कामकाज सांभाळले.
न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीला शनिवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. यावेळी सरकारी पक्षातर्फे ॲड. निकम यांच्या गैरहजेरीत सरकार पक्षाच्या वतीने ॲड. दीपक वैद्य यांनी कामकाज सांभाळले. आतापर्यंत या खटल्यात एकूण १६ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामुळे आज कबुली जवाब आणि जप्ती पंचनामा पंचांची १६वी साक्ष नोंदविण्यात आली आहे.
आता या खटल्याची पुढील सुनावणी ५ व ६ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती सरकारी अधिवक्ता ॲड. दीपक वैद्य यांनी दिली. प्रा. अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाची सुनावणी १७ फेब्रुवारीला झाली होती. त्यानंतर आजची तारीख देण्यात आली होती. या तारखेला अपूर्ण असलेल्या पंचनाम्यातील साक्षीदारांची आज साक्ष नोंदविण्यात आली आहे.