पुलगाव : निसर्गकोप आणि रोगराईमुळे यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. आता हे नुकसान भरून काढण्यासाठी ओलिताची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांसह भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली आहे. पारंपरिक पिकांसोबत नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतले जात असून यात शेतकरी महिलाही कुठे मागे नाहीत. रोहणी येथील एका शेतकरी महिलेने दीड एकरामध्ये मिरचीची लागवड करून तब्बल पाच लाखांचे उत्पन्न मिळवून प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले आहे.
पुलगाव नजीकच्या रोहणी (वसू) येथील शेतकरी महिला नीता मनोज वसू यांनी आपल्या शेतामध्ये पारंपरिक पिकांसोबत दीड एकरात मिरचीची लागवड केली. दीड एकर जागेवर मिरचीची लागवड करण्यासाठी नर्सरीत तयार झालेली साडेसात हजार रोपटे सव्वा रुपये नगाप्रमाणे विकत आणली. दोन झाडांमध्ये योग्य अंतर ठेवून योग्य मशागत केल्याने शेतातील मिरची चांगलीच बहरली.
हिरव्या झाडांना चांगला फुलोरा आल्याने मिरच्याही चांगला लागल्या. या हिरव्या मिरच्यांची तोडणी न करता लाल मिरच्यांची तोडणी करून वाळवायला सुरुवात केली. पहिल्या तोडणीत १८ क्विंटल वाळलेल्या मिरचीचे उत्पादन झाले असून अजून आठ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. आजच्या बाजारभावानुसार पाच लाखांचे उत्पादन अपेक्षित असून रोपटे, लागवड आणि पीक व्यवस्थापन यावर साधारत: दीड लाखांचा खर्चवजा जाता साडेतीन लाखांचा निव्वळ नफा राहणार आहे, असेही या शेतकरी महिलेने सांगितले.