वर्धा : चिकणी जामनीसह परिसरात पेरणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकावर ऐन शेंगा भरण्याच्या हंगामातच व्हायरसचा अटॅक झाला आहे. यामुळे अवघ्या सात दिवसातच पुर्णत: सोयाबीनची झाडे करपून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढवले आहे. पण मात्र कृषिविभाग उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
देवळी तालुक्यातील जामनी येथील शेतकरी वाल्मिकराव येणकर यांनी केलेल्या शेतातील एक एकर शेतात बीजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. यासाठी त्यांना मकत्यासह २५ हजार रुपये खर्च आला, खत, फवारणी, वेळोवेळी देण्यात आले. तसेच पाण्याचेही व्यवस्थापन योग्य रित्या करण्यात आले. यामुळे सोयाबीन पीक चांगले बहरून आले फुले व शेंगही अधिक प्रमाणात लागल्या होत्या. यामुळे चांगले उत्पादन होईल अशी अपेक्षा येणकर यांना होती. पण व्हायरसच्या अटॅकमुळे येणकर यांचा चांगल्या उत्पादनाच्या स्वप्नाचा पुरता चुराडा झाला. पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटाच्या कात्रीत सापडला असल्याचे दिसून येते.