वर्धा : वर्धा जिल्ह्यातील होतकरू तरुणांसह राज्यातील तसेच राज्याबाहेरील इतर जिल्ह्यातील नागरिकांना कर्ज देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना हिंगणघाट पोलिसांनी जेरबंद करून पोलीस कोठडी मिळविली होती. त्यांची पोलीस कोठडी संपत असल्याने या तिन्ही महाठगांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
हिंगणघाट परिसरातीलच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातील हजारो बेरोजगार युवक व युवतींना १० हजार २५० रुपये नगदी घेऊन तुम्हाला कर्ज मंजूर झाल्याचे सांगत पाच लाखाचा बोगस धनादेश देत त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या टोळीचा हिंगणघाट येथील डाव फसला. कुठलीही परवानगी न घेता कर्ज मेळाव्याच्या नावाखाली नागरिकांची गर्दी झाल्यावर ५ मार्चला हिंगणघाट पोलिसांनी वेळच दखल घेत हा फसवणुकीचा डाव हाणून पाडला होता. त्यावेळी कंपनीच्या स्थानिक संचालक प्रमोदीनी आस्कर यांना गजाआड करण्यात आले होते.
पोलीस चौकशीसाठी सुरुवातीला न्यायालयाने तिची १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. तर नंतर १५ मार्चपर्यंत पीसीआरमध्ये न्यायालयाने वाढ केली होती. आस्कर ही पोलीस पोलीस कोठडीत असतानाच १० मार्चला फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रमुख सुत्रधार आशीष डे याला कोलकाता विमानतळावरुन व बनावट धनादेशांसह तसेच ईएमआय कार्ड छापणारा सिमांचल पांडा याला मुंबईहुन अटक करण्यात आली. या दोघांनाही न्यायालयाने १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. या तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्याने आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद लक्षात घेवून न्यायालयाने तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.