परिचितांकडूनच महिला, मुलींवर सर्वाधिक अत्याचार! अत्याचारासह विनयभंगाच्या घटना चिंताजनक; पालकांच्या चिंतेत झाली वाढ

वर्धा : आधी मैत्री… नंतर निर्माण होते जवळीक… अन्‌ प्रेमाचे जाळे विणून… लग्नाच्या आणाभाका घेत अनेक परिचितांकडून महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे. २०२० वर्षकोरोनात गेले असले तरी महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी हुंडाबळीच्या दोन घटना घडल्याचीही माहिती आकडेवारीवरून स्पष्ट झाली.

महिला, तरुणी, अल्पवयीन मुलींशी ओळख करून त्यांना प्रेमजाळ्यात अडकवून लग्नाचे आमिषदाखवत अत्याचार केला जातो. मुलगी जेव्हा लग्नाची गळ घालते तेव्हा तिला नकार मिळतो. अशा घटना जिल्ह्यात सातत्याने घडत असल्याचे पोलीस ठाण्यातील आकडेवारीवरून नेहमीच स्पष्ट झाले आहे. ओळखीचा फायदा घेत अत्याचार तसेच विनयभंगासारखे प्रकारा करण्यापर्यंत विकृत मानसिकतेच्या लोकांची मजल जाते. अनेक जण बदनामीच्या भीतीने पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास तवार होत नाहीत. हे अत्याचार वेळीच रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कठोर पावले उचलण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

युवतींसह अल्पवयीन मुली, महिलांनीदेखील आपण कुणासोबत बोलतोय, कुणाशी परिचय करतोय, याची खात्री करूनच त्याच्याशी मैत्री करण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तीपेक्षा परिचित व्यक्तींकडूनच विनयभंग असो की अत्याचाराच्या घटना, सातत्याने वाढत असल्यामुळे हा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे. पालकांनीही आपला पाल्य कुणाशी बोलतेय, कुठे जातेय, हे तपासण्याची गरज आहे.असे केल्यास पुढे होणारी अप्रिय घटना टळू शकते. पोलीस विभागाकडून अनेकदा जनजागृती करण्यात येते. शहरात दामिनी पथकाद्वारेही अनेक युवक-युवतींना समज देण्यात येते. तरीदेखील या घटना सातत्याने वाढतच चालल्या असून, पालकांनीही याकडे लक्ष देत महिला व मुलींनी मैत्री पारखूनच करण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here