वर्धा : जी जन्मभूमी आहे… जी कर्मभूमी आहे… त्याच ठिकाणी आयुष्याचा शेवट झाल्यानंतर अंत्यसंस्कार व्हावेत, अशी आपल्याकडील परंपरा आहे. पण, कोरोनायनाने ही परंपराही मोडीत काढली आहे. असंख्य रुग्ण आपल्या जिल्ह्याच्या, प्रांताच्या सीमा ओलांडून वर्ध्यातील रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल झाले. उपचारादरम्यान त्यातील काही रुग्णांनी अखेरचा श्वास घेतल्याने या सर्वांवर वर्ध्यातीलच स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करावे लागले. शहरातील स्मशानभूमीत गेल्या दहा महिन्यांपासून अग्निदाह सुरूच असून, आता कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढू लागला आहे.
जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ही दोन मोठी कोविड रुग्णालये असल्याने या ठिकाणी इतर जिल्ह्यांतील रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचार घेण्याकरिता येतात. कोरोनाकाळात असंख्य रुग्ण विविध आजारांकरिता येथे दाखल झाले. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
या रुग्णांना इतरही आजार असल्याने बहुतांश रुग्णांनी दवाखान्यातच जगाचा निरोप घेतला. परिणामी, जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोनाबाधित मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन न करता वर्ध्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दहा महिन्यांत तब्बल ४७८ कोरोनाग्रस्त मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यामध्ये वर्धा जिल्ह्यासह अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, नांदेड, अकोला, भंडारा, बुलडाणा यासह हरियाणा, अदिलाबाद, बालाघाट, बैतुल येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे येथील स्मशानभूमीही कोरोनाकाळात अनेकांसाठी अखेरचा विसावा ठरली आहे.