

वर्धा : स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ नुसार जन्मठेप व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास तसेच भादंविच्या कलम ५०६ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल विशेष जिल्हा न्यायाधीश- सूर्यवंशी यांनी दिला, प्राप्त माहितीनुसार, आरोपी हा पत्री, पीडित मुलगी व मुलासह राहत होता. त्याने घरी कुणी नसल्याचे हेरून ‘पीडितेवर बळजबरी बलात्कार केला, आरोपी इतक्यावर थांबला नाही तर तो पीडितेने शारीरिक सुखासाठी नकार दिल्यावर मारहाणही करायचा. ‘पीडितेचा सहनशक्तीचा बांध फुटल्यावर तिने आईला घटनेची माहिती दिली.
हा धक्कादायक प्रकार पीडितेच्या आईने पीडिताचे मामा, आत्या, मोठी आई व आजी यांना दिल्यावर आरोपीने पीडिताच्या आईलाही मारहाण केली. सदर प्रकार गंभीर असल्याने अखेर सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे यांनी तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात सहा साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद तसेच पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश सूर्ववंशी यांनी आरोपीला वरील शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू अँड. विनय आर घुडे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून भारती कारंडे यांनी काम पाहिले.