वर्धा : जिल्ह्यात १ मार्चपासून तीन खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या तीन खासगी लसीकरण केंद्रांसह जिल्ह्यातील गाव पातळीवर असलेल्या लसीकरण केंद्रांवर वयोवृद्ध तसेच अतिजोखमीच्या व्यक्ती स्वयंस्फूर्तीने येत कोरोनाची लस घेत आहेत. मागील सात दिवसांचा विचार केल्यास ४ हजार ४१४ वृद्धांनी शासकीय केंद्रांवरून, तर ५३५ वयोवृद्धांनी खासगी लसीकरण केंद्रांवरून कोरोनाची व्हॅक्सिन घेतली आहे. अतिजोखमीच्या गटात येणाऱ्या तब्बल १ हजार ३७० व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.
१ मार्चपासून अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींसह वयोवृद्धांनाही कोरोनाची लस देण्याचे शासनाने निश्चित केल्यावर वर्धा जिल्ह्यातही प्रत्यक्ष लसीकरण केले जात आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावरून कोविडची लस देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील २८पैकी २० प्राथमिक आरोग्य केंद्रांवरून सोमवार ८ मार्चपासून प्रत्यक्ष लसीकरणही केले जात आहे.
१ ते ८ मार्च या कालावधीचा विचार केल्यास शासकीय लसीकरण केंद्रांवरून ६ हजार ६१३ व्यक्तिंना कोविडच्या लसीचा पहिला डोस, तर २ हजार ३७४ व्यक्तिंना कोविडच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. कोविड लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांमध्ये १ हजार ३६ अतिजोखमीचे, तर ४ हजार ४१४ वयोवृद्धांचा समावेश आहे.