वर्धा : पाण्याच्या शोधात वाघिणीसह आलेला बछडा कुंपणात अडकल्याने त्याच्या आईची साथ सुटली आणि बछडा तेथेच अडकला. शेतकरी शेतात आल्यावर त्याला ही बाब दिसली असता त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तब्बल सहा तासानंतर बछड्याला कुंपणातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या दरम्यान बछड्याला बघण्यासाठी शेतशिवारात आलोट गर्दी उसळली होती.
हेटीकुंडी परिसरातील शेतात मंगळवारी सकाळच्या सुमारास वाघिण आणि तिचा बछडा पाण्याच्या शोधात शेताकडे आले. दरम्यान बछडा अचानक शेतात शिरल्याने त्याची ताटातूट झाली. चहू बाजूने कुंपण असल्याने बछड्याला शेताबाहेर निघता येत नव्हते. शेतकरी शेतात आल्यावर त्याला बछडा दिसला असता त्याने वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतातील कुंपण काढण्यास सांगितले असता शेतकऱ्याने कुंपण काढण्यास मनाई केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला समजावून सांगितल्यावर त्याने कुंपण काढू दिले. बछड्याला कुठलीही हानी पोहचू नये, यासाठी बाजूला रंगबेरंगी कपडे लावण्यात आले होते. तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर बछडा शेताबाहेर पडला. यावेळी नागरिकांची शेतात आलोट गर्दी उसळली होती.