दारोडा : शेतात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतातील ज्वारीचे पीक जळून खाक झाले. पिपरी बेडा शिवारात ही घटना घडली. हिंगणघाट तालुक्यातील पिपरी पारधी बेडा येथील शेतकरी पोतूरकर चव्हाण यांनी ज्वारीची पेरणी केली होती. अचानक शॉर्टसर्किटमुळे शेतातील ज्वारी जळून खाक झाली. डोळ्यासमोर पीक राख झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे.
यावर्षी सुरुवातीपासून सोयाबीन, कापूस आणि तूर, पिकांचे नुकसान झाले असतानाही याकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाली नाही. असे असताना शेतकरी पोतुरकर चव्हाण यांच्या शेतातील २० ते २५ टन ज्वारी, बैलाचा चारा आणि शेतीपयोगी पाईप जाळून खाक झाले. यात शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान झाले असून शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.