
हिंगणघाट : कर्ज देण्याच्या नावावर सर्वसामान्यांची व्हिजन ऑफ लाईफ या. कंपनीने फसवणूक केली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करीत रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हिंगणघाट शहरामध्ये व्हिजन ऑफ लाईफ या नावाने कार्यरत एका कंपनीने शहरातील सामान्य नागरिकांना ५ लाख रुपये कर्ज मिळवून देतो, असे सांगत ४५ नागरिकांकडून प्रत्येकी १० हजार २०० रुपये रोख स्वरूपात घेतले. नागरिकांना ५ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, हा धनादेश वटवायला नागरिक बँकेत गेले असता तो बनावट खोटा असून तो वटू शकत नाही, असे बँक अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.
हिंगणघाट शहरातील एक व्यक्ती या कंपनीची एजंट म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणात चौकशी करीत कारवाई करावी तसेच पैसे परत मिळवून द्यावे, अशी मागणी ठाणेदार हिंगणघाट यांना सादर केलेल्या निवेदनातून किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण उपासे यांनी केली आहे. यावेळी फसवणूक झालेले हेमंत पोटदुखे, संदीप वाघमारे, विज्याल वाघ, विलास वाघ, रवींद्र खरे, प्रश्नांत काकडे, निखिल राऊत, सुनील वाघ, मोहित वखरे, शोभा गुरूनुले, अमित नाईक, अनिल शेजुल, अनंत मांगल यांच्यासह दत्ता वखरे, नंदा खैरे, गीता वखरे, इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.