विरूळ : दीड महिन्याची निरागस चिमुकली पाळण्यात झोपली होती. आईही तिच्या बाजूला झोपी गेली होती. अन् अचानक छतालगतची भिंत कोसळली सर्वत्र आरडाओरड झाली. मात्र, देव तारी त्यास कोण मारी… या म्हणीचा प्रत्यय आला देव बलवत्तर म्हणून मातेसह चिमुकली थोडक्यात बचावली. ही घटना विरूळ येथे दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
विरूळ येथील रहिवासी राजू मानकर यांची मुलगी प्रसूतीसाठी विरुळ येथे आली होती. तिने घरातील भ्रिंतीलगत पाळणा बांधून तिच्या दीड महिन्याच्या चिमुकलीला पाळण्यात झोपवून ती बाजूळा झोपली. मात्र, अचानक घराची भिंत कोसळली. हे पाहून मातेला जाग आली. तिने तत्काळ चिमुकलीला पाळण्याबाहेर काढताच पुन्हा भिंत कोसळली. मात्र, सुदैवाने मातेसह चिमुकलीचे थोडक्यात प्राण वाचले. चिमुकलीला कुठलीही इजा झाली नाही पण, मातेला किरकोळ जखमा झाल्या. या घटनेने गावातील नागरिकांनी मानकर यांच्या घराकडे धाव घेतली.