वर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी कोरोनाबाबतच्या खबरदारीच्या उपाय-योजनांचे पालन करण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. वर्धा जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २७ हॉटस्पॉट असून, त्यापैकी सर्वाधिक हॉटस्पॉट वर्धा तालुक्यात आहेत. याच हॉटस्पॉटमधून वर्धा शहर व परिसरातील इतर भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होऊ नये म्हणून सर्वाधिक कोविडबाधित असलेल्या किमान दोन ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून वर्धा जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. कोरोनाच्या संसर्गावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मागील १० दिवसांत तब्बल दोन वेळा ३६ तासांची संचारबंदी लागू केली. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात दररोज १०० पेक्षा जास्तच नवीन कोविड बाधित सापडत आहेत. गृहअलगीकरणात असलेले कोविड बाधित गृहअलगीकरणाचे नियम न पाळत असल्याने तसेच बहुतांश नागरिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन न करीत असल्यानेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासह इतर व्यक्तींना निरोगी ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेत जास्त रुग्ण आढळत असलेल्या भागाला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून तो परिसर सील करण्याचे जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या विचाराधीन आहे. त्यासाठीची प्रक्रिया सध्या केली जात आहे.