वर्धा : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालय व सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय गाठून येथील व्यवस्थेची पाहणी केली. याप्रसंगी रुग्णालयाची गरज आणि संभाव्य रुग्णसंख्या याबाबत त्यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मंगळवारी सकाळी पहिले सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून रुग्णसेवेबाबतचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव डॉ. गर्ग, रुग्णालयाचे अधिष्ठाता नितीन गंगणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कलंत्री, डॉ. सुबोध गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांची उपस्थिती होती. डॉ. सुबोध गुप्ता यांनी दुसऱ्या लाटेसंदर्भात केलेल्या अभ्यासाचे सादरीकरण केले. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या खाटांचा दैनंदिन अहवाल प्रशासनाला द्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.