समुद्रपूर : तालुक्यातील उमरेड-हिंगणघाट मार्गावरील गिरड शिवारातील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर समुद्रपूरकडे जात असलेल्या भरधाव दुचाकीस्वाराने पायदळ जात असलेल्या महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला. अशातच वाहन अनियंत्रित होत झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास झाला.
वसंता महाजन रा. शेडगाव असे मृतकाचे तर ज्योती प्रकाश रासोकर (४०) असे जखमी महिलेचे नाव असल्याचे सांगण्यात आले. समुद्रपूर येथील बाजार समितीचे संचालक वसंता महाजन हे नांद येशून एम. एच. ३२ ए. जी. ८०७४ क्रमांकाच्या दुचाकीने मुलीच्या घरील कार्यक्रम आटोपून शेडगाव येथे जात होते. दुचाकी गिरड शिवारातील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर आली असता ज्योती ही अचानक दुचाकीसमोरे आली. तिला वाचिव्ण्याच्या प्रयत्नात वसंता यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. अशातच वाहनाची महिलेला धडक बसली. यात वसंता महाजन यांचा मृत्यू झाला तर ज्योती या गंभीर जखमी झाल्या. जखमीवर हिंगणघाट येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र सूर्यवंशि, पंचम कोटगिलवार, प्रशांत ठोंबरे, महेंद्र गिरी, रवी घाटुरले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या अपघाताची नोंद गिरड पोलिसांनी घेतली आहे.