चिकणी : गावासह शेतशिवारात वीजतारा आणि खांबांना वेली, झुडपांनी विळखा घातला असून, अनेक झाडांच्या फांद्यांमध्ये वीजतारा गुरफटल्या आहेत. यामुळे आगीची घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याकुडे वीज वितरण कंपनी आणि ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. झाडांची छाटणी करीत वीजतारा आणि खांब मोकळे करावेत अशी मागणी शेतकर आणि नारिकांतून होत आहे.
चिकणी येथे ७० च्या दशकात वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्या वेळेस ज्या वीजतारा व खांब लावण्यात आले, तेच कायम आहेत. आता मात्र वीजतारा लोंबकळत असून काही वीजखांब जीर्ण झाले आहेत. वीजवाहिनीच्या खाली मोठमोठी झुडपे वाढली आहेत. गावातील तथा शेतातील वीजतारा झाडांच्या फांद्यांना छेदून गेल्या आहे. थोडाही वारा सुटला, माकडांनी झाडांवर उड्या मारल्या की फांद्याचे व तारांचे घर्षण होते आणि वीजपुरवठा खंडित होतो. घर्षणामुळे आगीच्या ठिणग्याही पडतात. या ठिणग्यांमुळे गावाला आग लावण्याची शक्यता बळावली आहे. वीज महावितरण कंपनी व ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष लक्ष देऊन वीज वितरण कंपनीकडून झाडांच्या विळख्यातून वीजतारा मोकळ्या करण्यात याव्या, अशी मागणी गावकरी करीत आहेत.