वर्धा : माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून संतापलेल्या आरोपी पतीने विवाहितेला जाळून मारण्याचे निष्पत्र झाल्याने आरोपी मुरली ऊर्फ मुरलीधर लक्ष्मण येवले याला जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा तिसरे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन. मिश्रा यांनी ठोठावली.
आरोपी हा मृताला माहेरून प्लॉट घेण्यासाठी, निवडणूक लढविण्यासाठी आदी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वारंवार पैश्याची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन मारहाण करायचा. १८ जानेवारी २०१३ मध्ये मृत विवाहितेच्या आईला नागरिकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी १० हजाराची मागणी केली होती. याच कारणातून
आरोपी मुरलीधर आणि त्याच्या पत्नीत वाद झाला होता, पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने १९ जानेवारी २०१३ मध्ये अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून दिले होते. याबाबतची तक्रार मृत विवाहितेच्या आईने पुलगाव पोलिसात दिली होती. मात्र, तपासादरम्यान आरोपी मुरलीधर थानेच पत्नीला जाळून जीवे ठार केल्याचे निष्पन्न झाले.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस.डी. मुरमे यांनी तपास पूर्ण करून सबळ पुरावा उपलब्ध केला. त्यानुसार, आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. विद्यमान
न्यायालयाने याप्रकरणात दोषारोपपत्र तयार केले. शासनातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे जिल्हा शासकीय अभियोक्ता गिरीश व्ही. तकवाळे यांनी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी अनंत रिंगणे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद तिजारे यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर करुन मोलाची कामगिरी बजावली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपील आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.