वर्धा : शाळेत शिक्षक रागावल्याचा राग मनात धरून घरी कुणालाही न सांगता निघून गेलेली अल्पवयीन मुलगी वर्धा युवती रेल्वेस्थानकावरील फलाटावर एकटीच फिरत होती. गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी तिला ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केले, आरपीएफ पोलीस कर्मचारी रेल्वेस्थानक परिसरात रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना त्यांना एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी रेल्वे फलाटावर एकटीच फिरताना दिसून आली. आरपीएफ पोलीस हनुमंत पटोले यांना संशय आल्याने त्यांनी तिला विचारपूस केली असता तिच्याकडून समाधानकार उत्तर न मिळाल्याने तिला पोस्ट उपनिरीक्षक एस.डी. दिघोले यांच्यासमोर नेण्यात आले. तेथे विचारपूस केली असता मुलीने मला शाळेत शिक्षकांनी रागविल्याने मी घर सोडून रेल्वेस्थानकावर आल्याचे सांगितले. दरम्यान मुलीकडून प्राप्त केलेल्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करून माहिती दिली असता मुलीचे आई वडील वर्धा रेल्वेस्थानकावरील आरपीएफ पोलीस ठाण्यात आले शासकीय पंचासमक्ष ओळख पटवून मुलीला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. घरच्यांनी आरपीएफ पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या कार्याबद्दल रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक विजयकुमार त्रिपाठी यांनी कौतुक केले.