आजनसरा : क्षुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन बापाने विवाहित मुलावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यास गतप्राण केले. ही घटना आजनसरा शिवारात घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी बापास ताब्यात घेतले आहे. प्रमोद काचोळे (३०) असे मृतकाचे, तर अरुण काचोळे (५६) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आजनसरा येथील अरुण काचोळे यांना दोन मुले आहेत. अरुण हा पत्नी व मुलांसोबत राहत असला तरी त्याला दारूचे व्यसन आहे. मद्यधुंद अवस्थेत अरुणचे कुटुंबीयांसोबत नेहमीच खटके उडायचे. याच त्रासाला कंटाळून प्रमोद हा मागील दोन वर्षांपासून गावातच भाड्याच्या घरात राहत होता. प्रमोद हा शेती, मालवाहतूक व पानटपरीच्या व्यवसायातून कुटुंबाचे पालन-पोषण करायचा. एक वर्षांचा मुलगा असलेला प्रमोद हा शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतात असताना तेथे अरुण हा मद्यधुंद अवस्थेत आला. शिवाय तो प्रमोदला क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करू लागला. शिवीगाळ करण्यास हटकले असता अरुणचा पारा चढला. दरम्यान, अरुण याने जवळ असलेल्या कुऱ्हाडीने प्रमोदवर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. प्रमोदचा आरडाओरडा ऐकून शेजारील शेतात असलेले चाफले हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती प्रमोदचा भाऊ विनोद याला दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी प्रमोदला वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्याने प्रमोदला सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात हलविण्यात आले.
तेथे उपचारादरम्यान प्रमोदचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात आरोपी अरुण काचोळे यांच्याविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अरुण काचोळे याला ताब्यात घेऊन अटक केली असून, पुढील तपास हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात वडनेरचे ठाणेदार शेट्टे, पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपित्तरे, अजय वानखेडे, लक्ष्मण केंद्रे, प्रवीण बोधाने, विनोद राऊत करीत आहेत.