वर्धा : सख्ख्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या सोरटा येथील रहिवासी असलेल्या आरोपी नराधम बापाला अति विशेष जिल्हा न्यायाधीश-१ सूर्यवंशी यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ नुसार जन्मठेपेची शिक्षा व रुपये २ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास तसेच कलम ४ नुसार १० वर्षे सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ५ महिने सश्रम कारावास तसेच भादंविच्या कलम ५०६ अन्वये २ वर्षे सश्रम कारावास व ५०० रूपये दंड व दंड न भरल्यास २ महिन्यांचा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
प्राप्त माहितीनुसार, पीडिता ही आरोपीची सख्खी मुलगी असून घरी कुणी नसताना आरोपी नराधम बापाने पीडितेवर बळजबरी बलात्कार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घडलेला प्रकार कुणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. वडिलांकडून वारंवार शारिरीक शोषण होत असतानाच पीडितेचा सहनशक्तीचा बांध फुटला. त्यानंतर तिने मोठे धाडस करून मावशीसह आईला तिच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना सांगितली. पीडितेला धीर देत पीडितेच्या कुटुंबीयांनी सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली. या प्रकरणाचा संपूर्ण तपास तत्कालीन ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सहा साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. साक्ष-पुरावे आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आरोपीला सदर शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू ॲड. विनय घुडे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून नायक पोलीस शिपाई भारती कारंडे यांनी काम पाहिले.