नवी दिल्ली : हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांच्या ऑफिसवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ई.डी.ने छापा टाकला आहे. अभिसार शर्मा सध्या www.newsclick.in नावाची वेबसाईट चालवतात. या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी अनेकवेळा केंद्र सरकारवर अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शर्मा यांच्या कार्यालयावर छापा पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अभिसार शर्मा यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून छाप्याची माहिती दिली आहे.
ई.डी.ने केवळ न्यूज क्लिकच्या ऑफिसवरच नव्हे तर, गुंतवणुकदारांच्या कार्यालयांवरही छापे टाकले असल्याचे शर्मा यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे. अभिसार शर्मा यांनी एन.डी.टी.व्ही., झी, एबीपी न्यूज यांसारख्या आघाडीच्या हिंदू न्यूज चॅनेलमध्ये न्यूज अँकरपासून एडिटर या पदांवर काम केले आहे.
त्यांच्या पत्रकारितेतील कामाची दखलही घेण्यात आली असून, त्यांना दोनवेळा रामनाथ गोयंका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली असून, त्यांना हिंदी अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. २०१७ मध्ये त्यांना रेड इंक हा मानाचा पुरस्कारही मिळाला होता.