

वर्धा : जिल्ह्यातील पटवारी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले असतानाही गेल्या तीन महिन्यापासून त्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे आर्थिक ओढाताण होत असल्याने थकीत आणि नियमित वेतन तात्काळ देण्यात यावे, यासह इतरही मागण्यांकरिता पटवारी संघाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन करून जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. अपंग तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी पदोन्नतीने संपूर्ण विदर्भात पदे भरण्यात आली आहेत, पण वर्धा जिल्हा अपवाद आहे.
सेवा पुस्तके अद्यावत करणे, कालबद्ध पदोन्नती, अमुकंपा तत्त्वावर पदोत्रती, अपील प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे व आर्थिक लाभ, स्थायी कारण, ज्येष्ठता यादी, विनंती बदल्या, गौण खनिज प्रकरणात तलाठ्यांना सुरक्षा पुरविणे, कालबाह्य लॅपटॉप व प्रिंटर पुरविणे, पोलीस विभागाचा महसूल कामात हस्तक्षेप यासह विविध प्रश्नांसंदर्भात वारंवार निवेदन, चर्चा करूनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे अडचणी वाढत असल्याने जिल्हाभर पटवारी संघाने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर वेतनासह इतर मागण्या निकाली काढाव्यात अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केळे जाईल, असा इशाराही जिल्हा पटवारी संघाने निवेदनातून दिला आहे.