

वर्धा : दुचाकी-चारचाकी वाहनांची वाढती संख्या, अतिक्रमण, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहनचालकांचा निष्काळजीपणा, वाहनतळाचा अभाव आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत आहे. अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा उभ्या असतात, तर वाहनतळाअभावी दुकानासमोर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने असंतुलित होत अपघात होतात. वाहन चालवताना अनेक अडथळे पार करीत वाहनधारकांना अमरावतीकडे कसेबसे जावे लागत आहे.
शहरातील अनेक ठिकाणे अपघातप्रवण स्थळ झाले आहे. बस स्थानक तसेच इलायची कार्यालयासमोर ऑटोरिक्षा, काळी-पिवळी व ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केले जात असल्याने वाहनचालकाला मुख्य रस्त्यावरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे नेहमी अपघात होतात. पोलीस विभाग, नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशी नागरिकांची मागणी आहे.