

वर्धा : तालुक्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा स्टील प्लँटमध्ये आज सकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास एक अपघात झाला. स्टील प्लँट वार्षिक देखभालीसाठी काल सायंकाळी बंद करण्यात आला होता. सकाळी ५.३० वाजता फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेसमधील राख बाहेर काढण्यासाठी ५० कामगार काम करीत होते.
फरनेसमधील राख काढत असताना गरम हवेसोबत राखेचे कण एकदम अंगावर उडाल्यामुळे ३८ लोक जखमी झालेत. यातील २८ व्यक्तींना सावंगी मेघे येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर १० व्यक्तींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कुणाचाही मृत्यू नाही. तसेच ४० टक्के भाजल्याच्या गंभीर जखमा असलेल्या ६ व्यक्तींना अति दक्षता केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात भरती रुग्णांची विचारपूस करून रुग्णांनाच्या नातेवाईकांना धीर दिला.