मोहन सुरकार
सिंदी (रेल्वे) : स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याने याअगोदर लंम्पी स्किन डिसीजवर औषोधोपचार व लसीकरण केले होते. मात्र पशु संख्येच्या तुलनेत हे अपुर्ण होते याची दखल घेत राष्ट्रहित न्यूजने बातमीतुन लसीकरणाची गरज मांडली होती. प्रशासणाने याची दखल घेत शनिवारी (ता.२६) सिंदी पशु वैद्यकीय दवाखान्यात नव्याने लसीकरण शिबीर आयोजित केले सदर शिबीरात शहरातील ८४ बाधित जनावरांना औषोधोपचार तर १०० जनावरांवर लसीकरण करण्यात आले असून पशु पालकानी सकाळ पासुनच लसीकरणासाठी गर्दी करत उदंड प्रतिसाद दिला.
सदर शिबीर जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था व पशुसंवर्धन जिल्हा परिषद वर्धा आणि बजाज कृषी महाविद्यालय पिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराकरिता बजाज कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शाम कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिल बुचे व कृषी विज्ञान संस्थेचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. योगेश गावंडे व डॉ. प्रकाश भिसेकर, डॉ. अर्जुन दंडारे यांचे मोलाचे योगदान दिले.
याप्रसंगी डॉ. प्रकाश भिसेकर यांनी पशुधन मालकांना संबोधित करताना सांगितले की जनावरांना लंम्पी रोगापासून दूर ठेवायचे असेल तर सर्वप्रथम गुरांचा गोठा कीटकनाशकाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे व जी जनावरे रोगाने बाधित झाली नाही त्यांना दवाखान्यात आणून लसीकरण करून घेणे हा एकमेव उपाय असल्याने सांगितले. तसेच ज्या जनावरांना हा रोग झाला आहे. त्याच्यावर योग्यवेळी औषोधोपचार केल्यास जनावरे बरी होतात असेही सांगितले.
लम्पी हा रोग केवळ आपल्या देशात बैल, गाय व त्यांची वासरे यांनाच आढळून आला असल्याने सांगण्यात आले परंतु या रोगाकडे दुर्लक्ष झाल्यास इतर जातीच्या जनावरांना देखील या रोगाची बाधा होऊ शकेल अशीही भीती व्यक्त करण्यात आली.
या शिबिरासाठी पर्यवेक्षक अर्जुन दंडारे, सेवाभावी डॉ. दिनेश कस्तुरे, कंपाऊंडर रामा चाहनकार यांनी देखील शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.