संजय धोंगडे
सेलू : मागील २५ वर्षांपासून वसाहत असलेल्या भगत लेआऊटचा मुख्य रस्ताच नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. उडान पुलजवळील व टेलिफोन एक्सचेंज कार्यलयाजवळून भगत लेआऊट मध्ये जाणाऱ्या रस्त्यात पावसाळ्यामूळे मोठे खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप झुडपे वाढली आहे.
या ठिकाणी रात्रीच्या वेळेला स्ट्रीट लाईट सुद्धा नाहीत. त्यामुळे येथे काळोख पसरला असतो. बाजूला मोठा नाला असल्याने तेथील परिसरात विषारी साप सतत आढळतात. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अशीच अवस्था बाजार समिती कडून काटोले यांचे घराकडे जाणार्या रस्त्याची आहे. हेतुपुरस्पर या रस्त्याचे कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलल्या जात आहे. दरवर्षी त्या रोडच्या खड्ड्यात थातुरमातुर मुरूम टाकून बुजविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी हजारो रुपयांचे बिल नगर परिषद प्रशासनाकडून काढले जाते.
मागील साडे चार वर्षअगोदर शासनाकडून सेलू शहरात नगरपंचायत घोषित झाल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या परंतु समस्या मात्र जैसे थेच आहेत.
शहरात नगर पंचायतीकडून सतराही प्रभागात विकास कामांचा धडाका सुरू असतांना त्या मुख्य रस्त्याकडे मात्र जाणून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मागील महिन्यात नगर पंचायतने त्या रस्त्यावर मुरूम टाकून गड्डे बुजविले, पण पर्याप्त मुरूम टाकण्यात आला नसल्याने पुन्हा खड्डे पडून खड्ड्यात पाणी जमा झाले. त्यामुळे तेथून वाहने तसेच पायदळ ये-जा करण्याऱ्या नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागत आहे.
या समस्येबाबत अनेकदा नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदन व तक्रारी दिल्या. परंतु, रस्त्याची समस्या अजूनपर्यंत निकाली निघाली नाही. नगर पंचायतीकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे वरिष्ठ नेत्यांनी तथा अधिकार्यांनी लक्ष वेधून त्वरीत उपाययोजना करावीअशी मागणी केली जात आहे.