

वर्धा : जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन दहेगाव येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार विलास शंकरराव बालपांडे यांचे आज बुधवार (ता. ३) कोरोना या आजाराने मृत्यू झाला. या घटनेेने पोलिस विभागात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
विलास बालपांडे हे गडचिरोली पोलीस दलामध्ये सन १९९४ मध्ये भरती झाले होते. गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्हयामध्ये त्यांनी उत्कृष्ठ सेवा दिली व सन २००५ मध्ये आंतरजिल्हा बदली करुन वर्धा जिल्हयामध्ये आले. वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन समुद्रपुर येथे कर्तव्य बजाविले व सध्या दहेगाव पोलीस स्टेशनमध्ये ते कर्तव्य बजावित असतांना ता. २७ कोरोनाची लागन झाल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसाचे उपचारानंतर त्यांना हिंदी विश्वविद्यालय येथील राजगुरु छात्रावास कोविड सेंटर येथे इंन्टीटयुशनल काॅरेनटाईन ठेवण्यात आले होते त्यादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला.
पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे विलास शंकरराव बालपांडे यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक, निलेश ब्राम्हणे तसेच इतर अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी उपस्थीत होते.