वर्धा शहराच्या प्रवेशद्वारावर ‘नीलपंख’चे शिल्प लावले जाणार! सेवाग्राम विकास आराखडा समितीने दिली मान्यता

वर्धा : शहर पक्षी ठरलेल्या नीलपंखाचे शिल्प वर्धा शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यास सेवाग्राम विकास आराखडा समितीने मान्यता दिली आहे. यासाठी बहार नेचर फाउंडेशन या पक्षीप्रेमी संघटनेने पाठपुरावा केला होता. पालकमंत्री सुनील केदार यांनी या नीलपंखाचे शिल्प वर्धा शहराच्या प्रवेशद्वारासोबतच शहरातील मुख्य चौकात लावण्याचे मान्य केल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आज (शुक्रवार) बहारच्या कार्यकारिणी मंजूर करण्यात आला.

वर्धा येथे २२ ऑगस्ट हा शहरपक्षी दिन म्हणून पाळल्या जातो. २२ ऑगस्ट २०१८ रोजी शहरपक्षी ठरविण्यासाठी निवडणूक घेण्यात आली होती. वर्धा नगर परिषद व बहार तर्फे आयोजित ही पक्षी निवडणूक महाराष्ट्रातील दुसरी तर विदर्भातील पहिली निवडणूक ठरली होती. पक्षांचे महत्व नागरिकांपर्यत पोहोचविण्याच्या या उपक्रमात ५२ हजार वर्धेकरांनी मतदान केले होते.
वर्धा परिसरात आढळणाऱ्या चार पक्षांपैकी सर्वाधित मतदान नीलपंख या पक्षास मिळाल्याचे ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ मारूती चितमपल्ली यांनी त्यावेळी जाहीर केले होते. या उपक्रमाची नोंद लिंमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. बहारने यासोबतच पक्षी सप्ताह साजरा करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला प्रतिसाद म्हणून राज्य वन्यजीव मंडळाने ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान राज्यभरात पक्षी सप्ताह साजरा करण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे यावर्षी प्रथमच राज्यात पक्षी सप्ताह साजरा होईल. या पार्श्वभूमीवर शहरपक्षी नीलपंखाचे शिल्प पक्षी सप्ताहापर्यत उभारण्याची मागणी बहारतर्फे आज जिल्हा प्रशासनाकडे नोंदविण्यात आली.
नागरिकांनी आपल्या परिसरात नीलपंखाचे चित्र तसेच विविध पक्षांची माहिती प्रदर्शित करून शहरपक्षी दिवस साजरा करावा, असे आवाहन बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे यांनी केले. शहरपक्षी दिनानिमित्य शनिवारी सकाळी आठ वाजता ऑक्सिजन पार्क परिसरात पक्षीज्ञान फलक उभारून हा दिवस साजरा केल्या जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here