वृक्षतोड थांबविण्यासाठी स्त्रियांचे भावनिक अभियान; भगिनींनी बांधले वृक्षांना रक्षा सूत्र

वर्धा – सेवाग्राम रस्ता रुंदीकरणाच्या कामाकरिता होत असलेल्या संभाव्य वृक्षकटाईला परिसरातील महिलांनीही विरोध दर्शविला असून या झाडांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेत ‘रक्षा सूत्र’ अभियान सुरू केले आहे.
रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने बहीणभावाच्या नात्याची जपणूक करणाऱ्या या भगिनींनी वृक्षही आमची भावंडे आहेत, त्यांनाही दीर्घायुष्य लाभावे, अशी भावना जोपासत सेवाग्राम मार्गावरील झाडांना रक्षासूत्र बांधले. या आगळ्यावेगळ्या अभियानात सेवाग्राम, वरूड, धन्वंतरीनगर या भागातील महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. या महिलांनी कटाईसाठी खुणा केलेल्या वृक्षांना ओढणी, दुपट्टा, साड्यांचे काठ, चिंधी आणि सूतमाला बांधून वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
सदर मार्गावरील वृक्षांचे केवळ पर्यावरणीय महत्त्वच नसून आमचे भावनिक नातेही या झाडांशी जुळलेले आहे. चौपदरी रस्त्याची आम्हाला आज आणि भविष्यातही गरज नाही. हा रस्ता चौपदरी झाला नाही तर समाजाचे काहीच बिघडणार नाही, उलट चौपदरीकरण झाल्यास रस्त्यांवरून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे आमच्या घरातील सदस्यांचा जीव धोक्यात येईल. यासाठीच आम्ही रक्षा सूत्र बांधून वृक्षतोडीला आणि अनावश्यक रस्ता रुंदीकरणाला विरोध करीत आहोत, अशी सामूहिक भावना प्रिया कोंबे, मंजूषा देशमुख, भाग्यश्री उगले, निरंजना बंग, ज्योती पासवान, वैशाली आत्राम, प्रतिभा ठाकरे, डाॅ. वर्मा, डाॅ. गुप्ता, प्रिया, जगताप, सावित्री, नागोसे आदी भगिनींनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here