-प्रवीण धोपटे
———————-
“गांधी फॉर टूमारो” या कल्पक, सृजनशील आणि समर्पक नावाला सहा वर्षांपूर्वी भाजपच्या रुपात सत्ताबदल होताच सेवाग्राम विकास आरखड़ा असे सपक, तांत्रिक अणि नीरस नाव देण्यात आले. निधीतही कपात करण्यात आली. 5 वर्षांच्या कालखंडानंतर वर्षभरापूर्वी पुन्हा सत्तेत भागीदार झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या शिवसेनेच्या सत्ताकाळातही सेवाग्राम विकास आराखड्याचे तीनतेरा सुरूच आहे.
सध्या या आराखड्यान्तर्गत वर्धा ते सेवाग्राम हा सामान्य वर्दळीचा रस्ता चौपदरी करण्याचा अट्टहास पूर्ण करताना या मार्गावरील डेरेदार वृक्षांची कत्तल करण्याचा सपाटाच सुरू करण्यात आला आहे.
वर्धा येथील गांधी पुतळा ते महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेले सेवाग्राम आश्रम इथपर्यंतचा परिसर ओसाड अणि भकास करण्याचा यंत्रणेने जणू चंग बांधला आहे.
महात्मा गांधी यांच्या वास्तव्य काळात लावलेली झाडेही यंत्रणेच्या अट्टहासी “विका-सा’तून सुटली नाहीत. मुळात वर्ध्यासारख्या लहान शहरातून सेवाग्राम सारख्या मर्यादित दळणवळण असलेल्या भागाकरिता फोरलेन मार्ग हवा कशाला???
नैसर्गिक सौंदर्य, पर्यावरणाचे संतुलन आणि वाटसरुंना शीतल छाया देणाऱ्या वृक्षांची कत्तल करून असा कोणता शाश्वत विकास साधला जाणार आहे??
चौपदरी रस्ते हे महानागरांचा अपवाद वगळता शहराच्या बाहेरुन असतात. येथे मात्र यंत्रणेला वर्धा हे महानगर झाले असून, त्याचा विस्तार सेवाग्रामपर्यंत झाल्याच्या शोध लागलेला दिसतो. तसेच या रस्त्याने प्रचंड वर्दळ होत असल्याचे उघड्या डोळ्यांचे स्वप्नही त्यांना पडून गेले आहे.
महात्मा गांधी यांचे विचार-आचार, योगदान, सेवाग्राम-वर्धा भागात घडलेल्या देशाच्या स्वातंत्र्य लढयाशी संबंधित घडामोडी, निर्णय, इतर बड्या नेत्यांचे वास्तव्य या थीमवर भर देण्याचे सोडून भौतिक विकास आणि अर्थकारणावर डोळा ठेवून आघात करणारा कथित विकास साधला जात आहे. काही कामे चांगली झाली हे कुणीही मान्य करेल; मात्र त्या ज़ोरावर इतर काहीही माथी मारणे ही स्वार्थावर डोळा ठेवून सत्तेची मगरूरी आणि यंत्रणेचा असंवेदनशीलपणाच आहे.
या मार्गावर अनेक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सेवाग्राम रुग्णालय आहे. विद्यार्थी शेक्डोच्या संख्येने पायी, सायकल वा दुचाकीने जोडरस्त्यावरुन या रस्त्यावर येतात, कर्मचारी, नागरिक, रूग्ण, त्यांचे नातलाग, मेडिकल स्टाफ विविध जोडस्त्यांवरुन या रस्त्यावरुन मार्गक्रमण करतात. उद्या वर्धा ते सेवाग्राम हा मार्ग चौपदरी झाला तर वाहनांची गती वाढून अपघातांच्या संख्येत वाढ होईल. अनेक संसार उद्ध्वस्त होतील, रुदन आणि आक्रन्दनाच्या अश्रूनी तथाकथित विकास धुवून निघेल.
म्हणूनच वृक्षतोड, चौपदरी मार्गाच्या विरोधात शहरातील वृक्षप्रेमी, पर्यावरणवादी यांनी एकत्र येऊन विरोधाचा झेंडा बुलंद केला आहे. जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले, राज्यकर्ते-लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. आता निर्णयाची वेळ कर्त्याकरवित्यांची आहे.
70-80 वर्षांपूर्वीपसून तर 20 वर्षांपूर्वी लावलेल्या आणि बहरलेल्या झाडांना तोडून टाकणाऱ्यां उच्चपदस्थांना विचारणा केली तर ते दुतर्फा रोपे लावण्याचे नियोजन आहे, असे सांगून मोकळे होतील; पण 1 झाड लावण्यासाठी, त्याचे संगोपन करण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात आणि किती काळ खर्ची घालावा लागतो हे निसर्ग सेवा समिती, वैद्यकीय जनजागृती मंच, जनहित मंच या वृक्ष प्रेमी संघटनाच सांगू शकतात. ही झाड़े कापणे म्हणजे एका पिढीकडून वृक्षाच्छादित परिसर हिसकून घेणेच होय.
या पापचे भागीदार जे होत असतील ते लोकहितविरोधी, पर्यावरणविरोधी आणि गांधीद्वेष्टेही ठरविले जावे.
कोट्यवधी रूपयांच्या कामात पैसा वरुन खालपर्यंत पाझरत पाझरत येतो हे सर्वश्रुत आहे. पण याचा अर्थ कमरेचे काढून डोक्याला “गुंडाळू” नये !!!