दिनेश बनकर/पंकज चहांदे
दखल न्यूज भारत
गडचिरोली- दि.14: गडचिरोली जिल्हयातील विविध कार्यालयातील शासकीय/निमशासकीय अधिकारी/कर्मचारी हे लगतच्या जिल्हयातून/तालुक्यांतून वारंवार ये-जा करीत आहेत. ज्यामुळे कोरोना संसर्गित व्यक्तींकडून संसर्ग झाल्यास मोठ्या प्रमाणावर शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये कोरोना आजाराचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेता सदर आजारावरील उचित प्रतिबंधात्मक नियंत्रणाकरिता आजपासून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना गडचिरोली जिल्हा सीमेत वारंवार अप-डाऊन करतांना निदर्शनास आल्यास त्यांचेविरुद्ध तशी नोंद चेकपोस्ट वरील प्रभारी अधिकारी यांनी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ लेखी कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर बाबतीत संबंधित अधिकारी वा कर्मचारी दोषी आढळल्यास सदर बाब शासकीय शिस्तीला अनुसरुन नसल्याने साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 चे तरतुदीनुसार संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे असे जिल्हाधिकारी यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.