वणी :- ता.प्र
ओबीसी प्रवर्गाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी नव्याने स्थापन होत असलेल्या ‘महाज्योति’ या संस्थेला ‘बार्टी’ आणी ‘सारथी’ च्या धर्तीवर अनुदान देण्याची मागणी ओबीसी बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांना संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी तहसीलदार, वणी यांचे मार्फत निवेदन पाठवून केली आहे.
इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्गातील मुला-मुलींना स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाठी सवलतीच्या योजना सुरू करता याव्या म्हणून संभाजी ब्रिगेड च्या पाठपुराव्याने “महाज्योती” स्थापन करण्यात येणार आहे . या संस्थेतर्फे राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाणार आहे अशी घोषणा राज्य सरकारने केली होती.
महाज्योति स्थापन करणेबाबत ची घोषणा मागच्या वर्षी युती सरकार मधील मंत्री श्री. संजय कुटे यांनी 2 जुलै 2019 ला केली होती. म्हणजे घोषणा होऊन एक वर्ष लोटून गेलं आहे. मात्र “महाज्योति” संस्था अजून सुरू झालेली नाही. ही संस्था सुरू न झाल्यामुळे 2019-20 च्या स्पर्धा परीक्षेबाबत OBC विद्यार्थ्यांना कोचिंग ची सुविधा मिळू शकली नाही.
मात्र एससी समाजासाठी असलेली बार्टी आणि मराठा- कुणबी सामाजासाठी असलेली सारथी संस्था सुरू आहे आणि विद्यार्थी लाभ सुध्दा घेत आहेत. सारथी ने मागील वर्षी 225 विद्यार्थी UPSC च्या तयारी साठी दिल्ली ला पाठवले देखील होते. आता मराठा-कुणबी विद्यार्थ्यांची नवीन तुकडी पुन्हा दिल्ली ला जाणार आहे.
महाज्योति स्थापनेसाठी अजून 1 महिना जरी विलंब झाला तर 2020-21 या शैक्षणिक वर्षात देखील OBC विद्यार्थ्यांनावरील लाभ घेता येणार नाही कारण दिल्ली मधील नामांकित कोचिंग मध्ये प्रवेश प्रक्रिया येत्या 15 दिवसात ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे.
मराठा-कुणबी व एससी समाजातील मुलांना ज्या सुविधा मिळत आहेत त्या OBC मुलांना सुद्धा लवकरात लवकर मिळाल्या पाहिजे, याकरिता त्वरित महाज्योति संस्थेची स्थापना करून ओबीसी बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी OBC विद्यार्थ्यांचे हिताचे रक्षण करन्याकरिता अनुदान देण्याची मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने केली आहे. यावेळी अजय धोबे, अॅड. अमोल टोंगे, अॅड. शेखर वराटे, आशिष रिंगोले, विवेक ठाकरे, दत्ता डोहे, संदिप गोहोकार संदिप रिंगोले, विजय दोडके, कपिल रिंगोले उपस्थित होते.